पुणे : ‘बालसंगोपन योजने’अंतर्गत निराधार व निराश्रित मुलांना दोन हजार २५० रुपयांचे अनुदान दरमहा देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. शासननिर्णय अजून झाला नाही, पण लवकरच त्यांना वाढीव अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी आता उत्पन्नाची मर्यादा निश्चित केली जाणार असून लाभासाठी संबंधित पालकांनी मुलास घेऊन बालकल्याण समितीच्या कार्यालयात येऊन अर्ज करणे अपेक्षित आहे.
कुटुंबातील कमावत्या आई किंवा वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्या मुलाला मधूनच शाळा सोडावी लागू नये म्हणून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बालसंगोपन (0 ते 18 वर्षांपर्यंतच) योजना राबविली जाते. सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ६० मुलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून अनुदानात वाढ झालेली नक्हती. ११०० रुपयांच्या अनुदानात त्या निराश्रित मुलांचा खर्च भागत नव्हता. या पार्श्वभूमीवर सरकारने बालसंगोपनाचे अनुदान दुप्पट केले. त्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला प्रत्येक विद्यार्थ्यामागे अडीचशे रुपये दिले जाणार आहेत.