युनूस तांबोळी
शिरूर : प्राथमिक शिक्षण हा शैक्षणिक जीवनातील मुलभूत पाया आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने ध्येय निश्चित केले तर जीवनात हमखास यशाची प्राप्ती होते. कष्टाची तयारी अन् संघर्ष करण्याचे धाडस विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन पारगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रेय गोविंद वळसे-पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकांनद, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्या संयुक्त जयंतीनिमित विद्यालयात आंतरशालेय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रताप वळसे पाटील, संचालक प्रकाश तापकीर, श्रीकांत पवार, हरिभाऊ शिंदे उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरशालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी व खो-खो खेळात आपले कौशल्य पणाला लावून आपल्या वर्गाला विजेतेपद मिळवून दिले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर खेळाचा आनंद लुटला. प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, क्रिडा शिक्षक भरत खिलारी, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आमटी-भाकरीचे माध्यन्ह भोजन…
विद्यार्थी टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रतिसाद देत होते. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनाला प्रती आण्याची आमटी भाकरी बनविण्यात आली होती. या वेळी भाताबरोबरच सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खास बाजरीची भाकरी आणली होती. सर्वांनी भाकरी व आमटीचा आस्वाद घेतला. शरद वळसे पाटील यांनी बनविलेली आमटी आणि खेळाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.