लोणी काळभोर : ‘‘गणेशोत्सव साजरा करताना बऱ्याच प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेली गणेशमूर्ती वापरली जाते. या प्रकारच्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्यावर त्यांचे लगेच विघटन होत नाही, त्यामुळे पाणी प्रदूषित होते. यावर उपाय म्हणून शाडूच्या मातीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव व विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे शनिवारी (ता.27) आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ हडपसरचे सदस्य संभाजी काकडे, अनिल रासकर, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी काकडे म्हणाले, “शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीच पर्यावरणपूरक असतात. अशा गणेशमूर्ती पाण्यात बुडविल्यावर त्यांचे विघटन लवकर होते व नदीचे पाणी ही अस्वच्छ होत नाही व पाणी प्रदूषित होत नाही. प्रत्येकाने आपल्या निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार करून त्यांच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीच वापरणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येकाने कोणताही सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करणे महत्त्वाचे आहे,”असेही काकडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, प्रशांत सरवदे यांनी प्रत्यक्ष शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती कशी तयार करतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. त्यानंतर कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने गणेशमूर्ती तयार केल्या. अशा एकूण 50 गणेशमूर्ती कार्यशाळेत तयार करण्यात आल्या. या बनविलेल्या गणेशमूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा निश्चय व समाजामध्ये पर्यावरणपूरक विषयी जनजागृती करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी केला. तसेच गणेशमूर्ती बनविण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला.
रोटरी क्लब हडपसर यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे धडे घेतले आहेत. तर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना संलग्न निसर्ग साधना स्वयंसेवकांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेतली. या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे, कला शिक्षक पराग होलमुखे , पर्यवेक्षक नरसिह जाधवर व विलास शिंदे यांनी केले होते.