लोणी काळभोर : विभागीय खो-खो स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. या संघातील चार खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड चाचणी घेण्यात आली असून दोन खेळाडूंची निवड होणार आहे. त्याचबरोबर विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थी प्रथमेश उमेश दळवी याची राज्यस्तरावर निवड होईल. त्यासंदर्भात लवकरच अधिकृत पत्र विद्यालयास प्राप्त होईल. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील वसुंधरा कन्या महाविद्यालयात गुरुवारी (ता.10) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण, पुणे नगरपालिका, पिंपरी चिंचवड नगरपालिका, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अहमदनगर ग्रामीण व अहमदनगर शहर या संघांचा समावेश होता. या स्पर्धेत पुणे जिल्हा ग्रामीणमधून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा १७ वर्ष वयोगटातील संघ पात्र ठरला होता.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूच्या १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा खो-खोचा अंतिम सामना सोलापूर ग्रामीण संघासोबत झाला. या स्पर्धेत विद्यालयाने सोलापूर संघाचे १० गडी बाद केले. मिळालेले आवाहन सोलापूर संघाने 1. 43 मिनिट राखून ११ गडी बाद करून पूर्ण केले. आणि हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. या स्पर्धेत विद्यालयाच्या खो-खो संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, विजेत्या संघातील खेळाडू व क्रीडा शिक्षक सुरेश कोरे व राजेश चौरे या दोघांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सीताराम गवळी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पर्यवेक्षक विलास शिंदे, नरसिंह जाधवर, ज्येष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे, कल्पना बोरकर, शशीराव शेंडगे, माजी राष्ट्रीय खेळाडू अभिजीत खेडेकर, काजल खेडेकर, राम विरकर, प्रणव विरकर, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
विभागीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी उपविजेते पद पटकाविले आहे. त्यामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उपविजेत्या संघातील 17 वर्ष वयोगटातील खेळाडू :
रोहन खामकर, सोहम खामकर, रेहान सय्यद, प्रशांत खरात, प्रणय शेंडगे, ऋषिकेश साळुंखे, आर्यन हालमे, रोहन होवाळ, प्रतीक कोरपे, अरमान कोरबू, कार्तिक खोचरे, गोविंद भाग्यवंत, अभिषेक कोळी, सोहेब मटके, सुमित मोरे.