लोणी काळभोर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे स्पर्धात्मक अभियानाच्या अनुषंगाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी ”स्वच्छता दूत” बनले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी शाळा व शाळेचा परिसर ‘स्वच्छ’ करण्यास सुरवात केली आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील. त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले सामाजिक आरोग्य जोपासता यावे. यासाठी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मधील विद्यार्थी ‘स्वच्छता दूत’बनले आहेत.
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात येत आहेत. या अभियानामुळे अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले आहेत. चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळावी, असा मूळ उद्देश शासनाचा आहे.
प्राचार्य सिताराम गवळी यांनी स्वच्छता दूत या अभियानाची सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वच्छता अभियान 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरावडा राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांवर ‘स्वच्छता दूत’ ही भूमिका निभवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अभियान लोणी काळभोर गावात व परिसरात उत्स्फूर्तपणे राबवले जात आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेची माहिती व त्यांचे उपयोग समजावून सांगितले आहेत.
शालेय परिसरात शंभर मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे. तरी अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास, याबाबत शैक्षणिक संस्थांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास ताबडतोब प्रशासन, पोलिसांना कळवावे.
– सीताराम गवळी, (प्राचार्य – पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर)