लोणी काळभोर : जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
पुण्यातील सणस मैदानावर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शाळेतील विद्यार्थी केतन जगताप व भक्ती चौधरी यांनी १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच गोलफेक स्पर्धेत त्या दोघांनीही प्रथम क्रमांक मिळविला. त्या दोघांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर अक्षरा ढवळे या विद्यार्थिनीने स्पॉट जंप स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक कमलाकर ढवळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, यशस्वी खेळाडू व क्रिडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत धूर्देव व सचिव अर्चना धूर्देव यांनी अभिनंदन करून भव्य सत्कार केला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
यशस्वी विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
जिल्हास्तरीय १०० मीटर धावणे स्पर्धेत केतन जगताप व भक्ती चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच या दोघांनीही गोलफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून दुहेरी पदकांची कमाई केली आहे. तर अक्षरा ढवळे हिने स्पॉट जंप स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.