गणेश सुळ
केडगाव : सध्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुतांश साथरोग अशुद्ध पाण्यामुळे होतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका संभवतो. अलिकडे बहुतांश मुले घरातून पाणी बॉटल घेऊन येतात. मात्र, यामुळे दप्तरासह पाण्याचे ओझे मुलांना वहावे लागते. मुलांची गैरसोय टळावी तसेच मुलांना शुद्ध पाणी शाळेतच मिळावे, यासाठी देलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला चैतन्य फायनान्स कंपनीतर्फे वॉटर फिल्टर भेट देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे; परंतु ते पाणी शुद्ध असेलच असे नाही. याचा विचार करून वॉटर फिल्टर भेट देण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची सोय झाल्याने पालकांनी आभार व्यक्त केले.
शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टरची गरज होती. रोहित भालेराव या गावातील सुपुत्राने काही पालक व शिक्षकांच्या मागणीची दखल घेतली. त्यानंतर फायनान्स कंपनीकडून फिल्टर देण्यात आले. कंपनीच्या योगदानामुळे आता शाळेला शुद्ध पाणी मिळणे सुकर झाले आहे. चैतन्य फायनान्सचे मॅनेजर आनंद नाईक, महादेव बिराजदार, राकेश सर, विनोद भानुसे, प्रणव लोंढे, गणेश शिंदे, अभिजित गाडे, विजय भोसले आदींच्या हस्ते या फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी मुख्याध्यापिका शेलार, अर्जुन वाघोले, सुरेश चांदगुडे, शंकर खेडेकर, चैतन्य वाघोले, सागर निगडे, डॉ. गायकवाड, शिक्षकवृंद, महिला सदस्य, ग्रामस्थ उपस्थि होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर शेलार यांनी सूत्रसंचालन केले. राजाभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केला. तर शेलार यांनी आभार मानले.