राहुलकुमार अवचट
यवत : सहकारी बँकिंगमधील संचालक मंडळाचे कामकाज, कर्ज प्रक्रिया, विविध प्रकारच्या सेवा, ऑडिट तपासणी, सभासदांचे हक्क व त्यांना मिळणारे लाभ…अशा नागरी सहकारी बँकांचे कामकाज विद्यार्थ्यांनी नुकतेच जाणून घेतले. यवत येथील व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली. या भेटीच्या वेळी बँकेचे सुरू असलेले कामकाज, अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ, ठेवीदार व खातेदारांशी त्यांचा होणार संवाद समजून घेण्यात विद्यार्थी रमले.
ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे, बदलत्या बँकिंग प्रणालीची ओळख होण्याच्या उद्देशाने व्यंकटेश मल्टीस्टेट यवत शाखेचे व्यवस्थापक मयूर कुंभार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व मुला-मुलींना शाखेला भेट देण्याचा आग्रह केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उज्वला रंधवे यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन यवत शाखेला भेट दिली. व्यंकटेश मल्टीस्टेटचे विभागीय अधिकारी प्रवीण यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभार यांनी मुलांना कामकाजाबाबत माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेत बँक व्यवहाराचे धडे घेतले. या वेळी शाखा व्यवस्थापक, रोखपाल यांचे काम कशा पद्धतीने केले जाते, बँक खाते कसे उघडायचे, बँक खात्यांचे प्रकार, खाते उघडण्यासाठी अर्ज कसा भरावा, पैसे भरणा स्लिप, काढणे याबाबत माहिती देण्यात आली. चेकचे प्रकार, चेक कसा भरावा यांसह बँकेतील लॉकर, तिजोरी प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बँकिंग व्यवहार व आर्थिक ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याने, हा उपक्रम सुरू केल्याचे यवत शाखेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
या अभियानामुळे भारतातील युवा तरुण शालेय जीवनापासूनच आर्थिक बचतीचे महत्त्व जाणेल, अशी प्रतिक्रिया विभागीय अधिकारी प्रवीण यादव यांनी व्यक्त केली. यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक एम. एम. सिंगे, शिक्षिका उज्ज्वला राजेंद्र रंधवे या वेळी उपस्थित होते. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी प्रवीण यादव व मयुर कुंभार यांचे आभार व्यक्त केले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच बँकेच्या वतीने दिनदर्शिका भेट देण्यात आली.