केडगाव : खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाचे इरा पब्लिक स्कुलने दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांचे हुबेहूब देखावे सादर केले.
‘ज्ञानोबा तुकाराम ‘ च्या जयघोषात आणि टाळ – मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान इरा पब्लिक स्कुल पासून करण्यात आले. संपुर्ण गावामधून हा दिंडी सोहळा निघाला. या लहान बालकांच्या दिंडीने एक आकर्षक रंग आणला होता. टाळ – मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परिसरात “पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल” असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वारकरी, टाळकरी, विनेकरी, खांदेकरी, पताकेवाले अशा अनेक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता.
या कार्यक्रमासाठी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सचिव सुर्यकांत खैरे, खजिनदार अरुण थोरात, संचालक भाऊसाहेब ढमढेरे, सतीश अवचट यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गावातील गणेश थोरात यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दिंडी सोहळा कार्यक्रमांचे आयोजन मुख्याध्यापिका निलम ससाणे व इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी अनेक ग्रामस्थ व प्रामुख्याने महिला वर्ग उपास्थित होते .