लोणी काळभोर : कोवळ्या न कळत्या वयात हाती आलेले मोबाइल, त्यावर सहज उपलब्ध होणारे आक्षेपार्ह व्हिडिओ, हिंसक प्रवृत्तीच्या गुन्हेगारी विश्वाशी संबंधित वेबसिरीज, हिंसेला खतपाणी घालणारे व्हिडीओ गेम यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणांवरून हिंसेची, सूड घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. लोणी काळभोर परिसरात नुकताच या घटनेचा प्रत्यय आला.
येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर बुधवारी (ता. ६) विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाचवी ते सातवीच्या वर्गाची शाळा बारा वाजण्याच्या सुमारास सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये अचानकपणे वाद सुरु झाले. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे रुपांतर थेट हामाणारीमध्ये झाले. अखेर स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले. यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि त्याचा मुलांच्या मानसिक स्थितीवर होणारा परिणाम, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलची शाळा दोन टप्प्यांत भरते. पाचवी ते सातवी प्राथमिक व अकरावी, बारावीची उच्च माध्यमिक शाळा सकाळी सात ते बारा या दरम्यान भरते. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा दुपारी बारा ते साडेपाच या दरम्यान भरते. पहिल्या दिवशी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा बुधवारी सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची हाणामारी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाचवी ते सातवीच्या वर्गाची शाळा बारा वाजण्याच्या सुमारास सुटल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये भांडण सुरु झाल्याचे निदर्शनास आले. ही हाणामारी पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना विद्यार्थ्यांमध्ये यंत्रणेचा कोणताही धाक नसल्याचे दिसून येत आहे. मिसरूडही न फुटलेल्या अल्पवयीन मुलांच्या डोक्यात भाईगिरीचे विचार थैमान घालत असून, यातूनच गुन्हेगारी प्रवृतीचा जन्म होतो आणि अल्पवयीन मुले गुन्ह्याच्या विळख्यात सापडतात, याचा प्रत्यय लोणी काळभोरमधील ग्रामस्थांना आला.
शाळा प्रशासन कारवाई करणार
दरम्यान, भांडण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पालकांना शुक्रवारी शाळेत बोलाविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भांडणे पालक व शालेय प्रशासनाच्या माध्यमातून मध्यस्थी करून सोडविण्यात येणार आहेत. तसेच येथून पुढे गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.
– सीताराम गवळी, प्राचार्य, पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, लोणी काळभोर
मुले हिंसक का होतात?
अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी हा सामाजिक प्रश्न आहे. मात्र, तो सोयीस्कररित्या पोलिसांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. बदलती लाइफस्टाइल, महागड्या गॅझेटचे आकर्षण, वाहनांची हौस अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. अल्पवयीन मुले सहजतेने याच्या प्रभावीखाली येतात. मोठ्यांकडून मिळणाऱ्या चुकीच्या मार्गदर्शनामुळेही गुन्हेगारी वाढते. आर्थिक जबाबदारीमुळे पालकांचा मुलांशी संवाद कमी असणे हे देखील महत्त्वाचे कारण आहे. टेलिव्हीजन वा इंटरनेटवर पाल्य हिंसक बाबी, अफेयर, कट-कारस्थान याचेच धडे घेणार असेल तर तो तसा प्रयत्न नक्कीच करून पाहतो. ही मनोवृत्ती असून, हे समजून घेण्यासाठी पालकांनीही सजग असायला हवे.
संवाद हेच उत्तम औषध
मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उद्धटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात सर्वांत महत्त्वाचे काम पालकांचे असते. मुला-मुलींच्या वागण्यात बदल होत नसल्यास समुपदेशन हाच त्यावरील उपाय आहे. मुलांशी होणारा संवाद हे यावर सर्वांत मोठे औषध आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा ऱ्हास यामुळे मुलांचे संगोपन कसे करायचे याचे आव्हान पालकांसमोर आहे. मुलांच्या प्रवृत्तींमध्ये बदल होत असल्याने याची जबाबदारी सर्वप्रथम पालक, शिक्षक, नातेवाईक आणि नंतर सर्वच समाजावर येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणाऱ्या गैरवापरावर अंकुश लावण्याची जबाबदारी पालकांना पार पाडावी लागणार आहे.