पुणे : पुण्यातील कारागृहामध्ये विद्यार्थ्यांना संशोधासाठी आता अभ्यास करता येणार आहे. राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. विविध विषयांवर राज्यातील तसेच देशातील विद्यापीठामार्फत संशोधन करण्यात येते़.
कारागृहातील कैद्यांवर देखील संशोधन करण्यासाठी विद्यार्थी हे आपला संशोधन विषय निवडत असतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेत अमिताभ गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे.
तसेच, त्यांनी नोंदणीकृत संस्था, विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनाकरीता कारागृह भेटीची परवानगी देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. त्यासाठी अटींवर परवानगी देण्यात येणार आहे.
तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देखील देण्याचे आदेश देण्यात आले आहे. कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.
या संशोधनामुळे कैद्यांच्या समस्या त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणं सोपं होणार आहे. या सगळ्यांमुळे संशोधकांना आणि त्यांच्यामार्फत अनेकांसमोर कारागृहातील कैद्यांच्या आयुष्याचा त्यांच्या मानसिकतेचा उलगडा होणार आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे देखील कैद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत. अशा प्रकारच्या संशोधनामुळे प्राप्त होणार्या अहवालामुळे सुधारणात्मक बदल घडण्यास मदत होईल, या संशोधनामुळे कैद्यांच्या समस्या तसेच विविध पैलूंवर प्रकाश टाकता येणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले आहे.