सागर जगदाळे
भिगवण : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या मुलांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे समान शैक्षणिक सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. एसटी, एससी व धनगर या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सवलती मिळतात, त्या सवलती ओबीसी व मराठा समाजाला मिळाव्यात, त्यामध्ये वसतीगृह भत्ता देखील मिळावा, या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात मंजुरी घेतली. त्यामुळे प्रा. झोळ यांच्या मागणीला यश आले आहे.
याबाबत बोलताना प्रा. झोळ म्हणाले की, मराठा व ओबीसी समाजाला आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी सवलती दिल्या तर खऱ्या अर्थाने त्या गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी-सवलतींमध्ये विद्यार्थ्यांना वसतीगृह भत्ता मिळणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने आपण एसटी, एससी व धनगर या प्रवर्गाप्रमाणेच मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांनाही वसतीगृह भत्ता मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यामार्फत वारंवार पाठपुरावा करत होतो. या मागणीला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने मान्यता देऊन या संबंधीचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे मराठा तसेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्ण वसतीगृह भत्ता मिळणार आहे. शिकत असलेल्या व वसतीगृहात राहत असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी प्रा. झोळ यांनी महाराष्ट्र शासनाला मराठा व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण फी माफी देण्याबाबत मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत, नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या चंद्रकांत दादा पाटील समितीने ईडब्ल्यूएस व ओबीसी प्रवर्गामधील मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संपूर्ण फी माफी करण्याबाबत व त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्याबाबत सरकारला शिफारस केलेली आहे.
प्रा. रामदास झोळ यांनी शैक्षणिक सोयी-सवलती समानतेच्या धोरणावर मराठा व ओबीसी घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या मागणीची दखल घेऊन, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मराठा समाजाला या समाजातील विद्यार्थ्यांना या रूपाने खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रा. रामदास झोळ यांनी केलेल्या मागणीला राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत प्रा. झोळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.