लोणी काळभोर: लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील बहुतांश शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षा व बसमध्ये अक्षरशः कोंबल्याचे चित्र पहायला मिळते. रिक्षा आणि बसचालक रस्त्यावरून जाताना वेगाने गाडी चालवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. शाळेच्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीचे कोणतेही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पूर्व हवेलीत अनेक नामवंत खासगी व सरकारी शैक्षणिक संकुले आहेत. या संकुलांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी येत आहेत. पूर्व हवेलीतील अनेक शाळांकडे मोठे वाहनतळ तसेच मैदान आहे. तरीही बस, रिक्षा व पालकांना रस्त्यावर का थांबावे लागते? शालेय प्रशासन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांची काळजी नाही का? शाळेने फक्त विद्यार्थ्यांकडून मोठमोठे शूल्क घ्यायचे आणि इतर अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करायचे, असे धोरण आखले आहे का? शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काही वाटत नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
विद्यार्थी शाळेत येताना सायकल, एवढेच नव्हे तर दुचाकीने येतात. काही विद्यार्थी तर एकाच दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ प्रवास करताना दिसतात. तर काही विद्यार्थ्यांना रिक्षा अथवा स्कूल बसने प्रवास करावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. याकडे लक्ष देण्याचे काम शालेय प्रशासनाचे आहे. मात्र, शालेय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने बस व्यावसायिक व रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात फावले आहे. विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत असेल, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळेने लक्ष देण्याची गरज
शाळा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थी व वाहनचालकांची रस्त्यावरच गर्दी होत आहे. पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थी वाहतूकीसाठी ये-जा करणाऱ्या स्कूलबस, रिक्षा, चारचाकी वाहने, दूचाकीने संपूर्ण रस्ताच व्यापला जात आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्याचा नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, जर शाळा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर वाहतूक नियंत्रकाची नेमणूक केल्यास मूळ प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होऊ शकते, असे मत परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन परिसरातील सरकारी नोकरदार, कामगार, शेतकरी व राजकीय पदाधिकाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये नर्सरी, दहावी ते उच्च पदवीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही मुलांचे पालक दुचाकी अथवा चारचाकीमधून सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येतात. मात्र, अनेक विद्यार्थी स्कूलबस अथवा रिक्षाने धोकादायकरीत्या प्रवास करून येतात. त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस उपयोजना करावी. या अवैध स्कूलबस अथवा रिक्षावर एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदरच कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
टवाळखोरांमुळे शाळेचा परिसर अस्वच्छ
कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतच्या शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळा सुटल्यानंतर काही टवाळखोर शाळेच्या आवारात प्रवेश करतात. तेथे गुटखा व तंबाखू खाऊन शाळेचा परिसर घाण करतात. मात्र, याचा नाहक त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दररोज हा दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छ करावा लागत आहे. त्यामुळे या टवाळखोर तरुणांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.