पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शाळेच्या पटांगणात शाळकरी मुलांमध्ये तुफान राडा झाला आहे. एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत ६ अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. स्कुल बॅग फाटल्यावरू दोघांमध्ये वाद झाले होते. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत.
नेमक काय घडलं?
पिंपरी परिसरातील एका स्कूलमधील एक अल्पवयीन विद्यार्थी १ फेब्रुवारीला दुपारी साधारण साडे बारा वाजण्याच्या दरम्यान परीक्षा द्यायला जात होता. तेव्हा शाळेच्या आवारत त्या विद्यार्थ्याची स्कूल बॅग एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा धक्का लागल्यामुळे फाटली होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. मात्र, परिक्षा असल्याने दोघेही पेपर सोडवण्यासाठी वर्गात गेले.
पेपर संपल्यानंतर या मुलांनी काटा काढला. ज्या मुलाने दप्तर ओढलं होतं. त्या मुलाने दोनचार मुलांना एकत्र करत मुलाला मारहाण केली. याच मुलांपैकी एकाने खिशात चाकू आणला होता. त्याने थेट चाकू काढून विद्यार्थ्याच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला.
यानंतर तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये ६-७ अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली नाही.