वाघोली: पीएमपी बस वळविताना एका विद्यार्थीनीच्या पायावरून चाक गेल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील केसनंद फाटा बीआरटी बस स्थानकात घडली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी पीएमपी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी मिश्रा असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून या प्रकरणी तिचे वडील जयचंद मिश्रा यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय कच्छवे या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही जेएसपीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेज संपल्यानंतर वैष्णवी बसने घरी जाण्यासाठी या बीआरटी स्थानकात आली होती.
बीआरटी स्थानकात बसच्या प्रतिक्षेत असताना तिथे एक बस आली. बस चालक वळण घेत असताना वैष्णवीला बसची धडक बसली आणि तिच्या पायावरून चाक गेले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.