पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा आणि अभ्यासाचा ताण यामुळे दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेहा प्रशांत वर्गीस असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीची नाव आहे. दोन दिवसांवर पूर्वपरीक्षा येऊन ठेपली असताना विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली.
ही घटना पुण्याच्या हडपसर भागातील मोहम्मदवाडी परिसरात शुक्रवारी (दि. ८) सकाळी सात ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहा दहावीत शिक्षण घेत होती. दोन दिवसानंतर पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नव्हते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती डॉ. उमा कुलकर्णी यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पालकांकडे चौकशी केली. दोन दिवसानंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.