राहुलकुमार अवचट
यवत : पुरोगामी संघटनांतर्फे आयोजित कलेल्या ‘निर्भय बनो’ सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगड, लाठ्या-काठ्या, हॉकी स्टिक तसेच लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करीत, शाई फेक केली. या घटनेचा महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून बुधवारी (ता. १४) निषेध करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, विधी तज्ज्ञ असीम सरोदे यांच्यासमवेत सभास्थळी जात असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गळा घोटण्याचा लाजिरवाणा प्रकार आहे. या घटनेतील हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या व प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये आमदार तसेच काही राजकीय नेत्यांमार्फत गुंडाकरवी पत्रकारांवर हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा घटना घडवणाऱ्यांना सरकारने योग्य शासन करावे, अशा मागणीचे पत्र निवेदनाद्वारे महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, संघटक अनिल गायकवाड, सचिव राहुल अवचट, बाळासाहेब मुळीक, विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, संदीप भालेराव यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.