पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्ताचा आढावा मागील दोन दिवसांपासून घेतला जात आहे.
बंदोबस्तासाठी 11 पोलीस उपायुक्त, 22 सहायक पोलिस आयुक्त, 64 पोलीस निरीक्षक, 311 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह 5 हजार 255 पोलीस कर्मचारी, 1870 होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि क्रेंदीय निमलष्करी सशस्त्र दल कार्यरत असणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करून बेकायदा दारू, गुटखा, जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्याबरोबरच बेकायदा शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गुन्हेगारांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. आता मात्र, मतदानाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
पुणे शहरात 716 इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. त्यांची विभागणी 168 सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. तेथे सहायक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक असतील. या केंद्रांवर कॉल मिळताच दोनच मिनिटांत गस्ती पथकाची वाहने पोचहतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यासोबतच 31 ठिकाणीही नाकाबंदी करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखा 40 टीम कार्यरत असून, त्यामध्ये 300 कर्मचारी तैनात आहेत. क्यूआरटी आणि घातपात पथके प्रत्येकी 6 पथक कार्यरत आहेत.पोलिस बंदोबस्त दृष्टिक्षेपात डीसीपी-11, एसीपी- 22, पोलीस निरीक्षक-64, एपीआय/पीएसआय-311, पोलीस अमलदार-5 हजार 255, होमगार्ड- 1 हजार 870, सशस्त्र केंदीय दले- 15, एसआरपीएफ कंपनी -2.