पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात संबंधितांवर १८७० गुन्हे दाखल केले असून २००६ आरोपींना अटक केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत म्हणाले की, मद्याची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाया केल्या आहेत. या कारवाईत १८७० गुन्हे दाखल करण्यात आले असून २००६ आरोपींना अटक करण्यात आली आहेत. २०० पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
तसेच या कारवायांमधून सुमारे १२ कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन केल्याप्रकरणी १५३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच १५६८ आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवायांमधून सात कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच कोटी रुपयांचा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश मिळाले आहे, असेही राजपूत यांनी सांगितले आहे.