वाघोली : हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदी तीरावर असणाऱ्या कृषी पंपाला वॉटर मिटर लाऊन, गटार गंगाचे पाण्यावर दहापट रक्कम वसूल करण्याच्या पाटबंधारे निर्णयाला विरोध करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी वाडे बोल्हाई येथे बावीस गावातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतीसाठी स्वच्छ धरणातील पाणी द्या, व योग्य पाणीपट्टी घ्या अन्यथा कुठल्याही शेतकऱ्यांनी या पुढे पाणीपट्टी भरू नये, उलट पक्षी १८ गावे पाणीपट्टीतून मुक्त करा असे निवेदन जलसंपदा विभाग यांना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी देण्यात आले होते.
तसेच ४ महिन्यानंतर २२ मार्च २०२४ रोजी पुन्हा स्मरणपत्र देवूनही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अशा जीवघेण्या वसुलीचे कृषीक्षेत्रावर परिणाम होत असताना याबाबत जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देऊनही अद्याप कुठलाच निर्णय जलसंपदा विभागाने घेतला नाही. त्यामुळे हिंगणगाव-बामगाव टैंक पासून मांजरी बु.पर्यंतच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कृतीसमितीचे अध्यक्ष बापूसाहेब पठारे व कृती समितीचे सचिव अंकुश कोतवाल व सर्व पदाधिकारी यांनी सरकारला दिला आहे.
खडकवासला धरणातून शेती सिंचनासाठी पाणी सोडत नसल्याचे लेखी उत्तर मुळा-मुठा नदी काठच्या शेतकऱ्यांना उपकार्यकारी अभियंता, खडकवासला पाठबंधारे विभागाकडून प्राप्त झालेले आहे. तसेच पुणे शहराने जलसंपदा विभागाकडून शहरासाठी घेतलेल्या पाण्यावर महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर पाणी पट्टी भरते, तेच पाणी पुन्हा नदीत सोडल्यानंतर त्याच दुषित केमिकलयुक्त मैला सांडपाण्यावर दुसऱ्यांदा दहा पट पाणी पट्टी आकारण्याचे काम जलसंपदा विभाग करित आहे.
याबाबत मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक ग्रामपंचायतींनी मीटरही नको व पाणीपट्टीही नको असा ठराव केला आहे, असे असतानाही वारंवार संबंधीत खात्याकडे पत्रव्यवहार करुनही काहीच उत्तर न मिळाल्याने हवेली तालुक्यातील मुला मुठा नदीकाठच्या शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सदरच्या निवेदनानुसार त्वरीत मुळा मुठा नदीकाठच्या शेतक-यांच्या कृषी पंपाना पाणीपट्टी आकारणीच्या जाचातून मुक्त करावे, अन्यथा प्रशासनाची उदासीनता लक्षात घेवून ३१ जून २०२४ रोजीच्या शेतकरी मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार ११ नोव्हेबर २०२४ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.