सागर जगदाळे
भिगवण : भादलवाडी येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीतील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या उपोषणाला १५ दिवस होऊनही निर्णय होत नसल्यामुळे ८ फेब्रुवारीला भिगवण येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी दिला.
बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीतील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत २४ जानेवारी २०२४ पासून तहसील कार्यालयाबाहेर पाच कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. पंधरा दिवस होऊनही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या कालावधीमध्ये माथाडी बोर्डाने एक फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ३० दिवसांचा कालावधी मागितला होता.
दरम्यान, सध्या उपोषणकर्त्या कामगारांची प्रकृती खालावलेली आहे. असे असतानाही १५ दिवस होऊनही कंपनीने कामगारांच्या प्रश्नांची योग्य दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. सरकारने गोरगरीब कामगारांना तत्काळ नियुक्तीपत्र द्यावे, या मागणीसाठी ८ फेबुवारी रोजी सकाळी १० वाजता भिगवण येथील हॉटेल सागर समोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन सनदशीर मार्गाने करण्यात येणार असून, कामगारांना लेखी नियुक्तीपत्र माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी ग्वाही आंदोलकांनी दिली आहे. तसेच कामगार गेली पंधरा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला संपूर्णतः बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी (भादलवाडी), माथाडी बोर्ड (पुणे), कामगार आयुक्त कार्यालय (पुणे) व प्रशासन जबाबदार राहील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.