सागर जगदाळे
भिगवण : भिगवणमध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील शाळांच्या बाहेर हिरोगीरी करणारे व अल्पवयीन शालेय दुचाकीचालक यांच्यावर भिगवण पोलिसांनी कारवाई केली आहे.
भिगवण पोलिसांनी थोरात हायस्कूल, भैरवनाथ हायस्कूल व क्षिरसागर कॉलेज येथे नाकाबंदी करून विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे, गाडीची कागदपत्रे जवळ न बाळगणे, त्याचबरोबर अल्पवयीन मुले गाडी चालविताना आढळून आल्याने त्यांच्या पालकांना समक्ष बोलावून यापुढे मुलांच्या ताब्यात गाडी न देणेबाबत समज देऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पालकांना आवाहन केले की, यापुढे लहान मुलांच्या ताब्यामध्ये गाडी दिल्यास पालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
कारवाईत हवे सातत्य
भिगवण पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे भिगवणकरांनी स्वागत केले असून या कारवाईत सातत्य राहिले पाहिजे. अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे. शाळेतील मुख्याध्यापक यांनीही दुचाकीवर येणाऱ्या मुलांच्या पालकांना याबाबत योग्य ती कल्पना देऊन मुलांचे भविष्यात होणारे नुकसान टाळावे. यासाठी पालकसभा घेतल्या जाव्यात जेणेकरून पोलिसांवर असणारा अतिरेक ताण कमी होऊन पोलीस ही ताज्या दमाने काम करतील .