लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट टोल नका ते कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मंगल कार्यालय व पार्टी हॉल आहेत. यामुळे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. यासाठी मंगल कार्यालय, पार्टी हॉल चालक व मालकांनी पार्किंगची व्यवस्था करावी. व कार्यक्रमाची व कार्यक्रमामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्पीकर व ड्रोन कॅमेऱ्याव्दारे चित्रीकारणाची पूर्व परवानगी घेवून याची माहिती पोलिसांना द्यावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई करण्यात येईल. असा कडक इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मंगल कार्यालय, पार्टी हॉलच्या चालक व मालकांना दिला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने नुकतेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगल कार्यालय, पार्टी हॉलच्या चालक व मालकांना एक नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये सांगितले आहे की, मंगल कार्यालय/पार्टी हॉल आयोजकांनी कार्याक्रमाची पोलीस ठाण्याला पुर्व कल्पना देवुन परवानगी घ्यावी. कोणत्याही कार्यक्रमामध्ये बीम/लेझर लाईटचा वापर करू नये. लग्न, साखरपुडा, पार्टी ई. कार्यक्रमामध्ये स्पीकर लावल्याचे निदर्शनास येत असुन सदर स्पीकर लावण्यासाठी पोलीस विभागाकडुन परवानगी घेवुनच स्पीकर लावण्यात यावेत.
मंगल कार्यालय/पार्टी हॉलसमोर कार्यक्रमांचे वेळी वारंवार वाहतुक कोंडी झाल्याचे दिसुन येत आहे. त्यासाठी पार्किंगची स्वतंत्र सोय करावी. व आस्थापनेच्या समोरील रस्त्यावर कार्यक्रमासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर्डन/स्वयंसेवक/गार्ड नेमण्यात यावेत. विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्यावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येते. बहुतांश ठिकाणी चित्रीकरण हे ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात येते. त्यासाठी रितसर पोलीस विभागाकडुन परवानगी घेवुनच चित्रीकरण करण्यात यावे. अन्यथा विना परवाना ड्रोन कॅमेराब्दारे चित्रीकरण करण्यात येवु नये.
दरम्यान, मंगल कार्यालय/पार्टी हॉलमध्ये भविष्यामध्ये चोरी सारख्या प्रकारास आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनीभागावर तसेच आस्थापवनेच्या समोरील सार्वजनिक रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच वरील सर्व सूचना व नियमांचे पालन करावे. अन्यथा विनापरवाना कार्यक्रम, स्पीकर व ड्रोन कॅमेऱ्याव्दारे चित्रीकरण झाल्यास त्याच्यावर प्रचलित कायदयानुसार कडक कारवाई करण्यात येईल. व सदर कारवाईमध्ये ही नोटीस पुरावा म्हणुन वापरली जाईल. असे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी सांगितले आहे.