प्रदिप रासकर / निमगाव भोगी : १९८ शिरुर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन १५ ऑक्टोबर २०२४ पासुन आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुक काळामध्ये राजकीय पक्ष, नेते कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचे कडेकोट पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
शिरुर-हवेली विधानसभेसाठी प्रशासन सज्ज झाले असुन २२ ऑक्टोबर पासुन उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. हे उमेदवारी अर्ज शिरुर तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या चेंबरमध्ये स्वीकारण्यात येणार असल्याचे राजापुरकर यांनी सांगितले. २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. ३० ऑक्टोबरला छाननी तर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती शिरुर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगिता रांजापुरकर यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुक काळामध्ये कायदा सुव्यवस्था व आचारसंहितेचे पालन व्हावे याकरीता निवडणुक आयोगाने तक्रार अॅप तयार केले असुन त्यावर तक्रार करायची आहे. त्या तक्रारीचे निरासन करण्यात येणार आहे. यासाठी शिरुर तहसिल कार्यालय येथे कंट्रोल रुमची उभारणी केली आहे. तसेच या अनुषंगाने शिरुर-हवेली तालुक्यामध्ये नऊ फ्लाईंग स्कॉडची स्थापना केली असुन हे २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच ३ स्थायी पथकाची नेमणुक केली आहे. शिरुर तालुक्यासाठी दोन तर हवेली तालुक्यासाठी वाघोली येथे १ पथक असणार आहे. तर शिरूर सतराकमानी पुलाजवळ एक चेक नाका तसेच तांदळी येथे एक चेक नाका असणार आहे. त्याबरोबर एक फिरते पथक राहणार आहे.
उमेदवार यांना त्यांच्या सभा, रॅली, लाऊड स्पीकर, वाहनांसाठी व इतर शासकीय परवानगीसाठी शिरुर तहसिल कार्यालय येथे एक खिडकी योजना सुरु केली आहे. त्यासाठी नायब तहसीलदार तसेच नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, महसुल विभाग व इतर विभागाचे अधिकारी या ठिकाणी परवानगी देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. शिरुर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
उमेदवारांना २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर अर्ज छाननी ३० ऑक्टोबर तर, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर आहे. तर मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबरला पार पडणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरुर विधानसभा मतदार संघात ४ लाख ५९ हजार ६९३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २ लाख ३८ हजार ८९७, तर महीला मतदार २ लाख २० हजार ७७३, तर इतर मतदार २३ एवढे आहेत.
शिरुर तालुका एकुण मतदार -२ लाख ११ हजार ४०९, पुरुष – १ लाख ७ हजार २४७, महीला – १ लाख ४ हजार २५२, इतर १०, हवेली तालुका एकुण मतदार-२ लाख ४८ हजार २३१, पुरुष – १ लाख ३१ हजार ६२७, महीला – १ लाख १६ हजार ५९१, इतर १३, आर्मी नोकरीत असणारे ४०३ मतदार, ३५४६ दिव्यांग मतदार आहेत. तर ८५ वर्षांवरील ५४९० मतदार आहेत. या निवडणुकीसाठी शिरुर-हवेली तालुक्यात ४५७ मतदान केंद्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजारपुरकर यांनी सांगितले आहे.