लोणी काळभोर, (पुणे) : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाने शुक्रवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, राज्य खजिनदार विजय काळभोर, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुडे, अमोल अडागळे, अमोल भोसले, जयदीप जाधव, हनुमंत चिकणे, विशाल कदम आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रात ठाम भूमिका घेऊन निर्भय अन सत्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार संरक्षण कायदा आहे. मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे.
यामुळे महाराष्ट्रात निर्भयपणे पत्रकारिता करणे तमाम पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. या बाबत शासनाने गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करण्यासाठी लढा देण्याची भूमिका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने घेतली आहे.
दरम्यान, राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या निर्घृण हत्येबाबत शासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाने केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.