लोणी काळभोर: लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व मांजरी परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत आहे. गेल्या वर्षात तब्बल 2 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. तर जवळपास 200 ते 300 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची प्रकरणे दर महिन्याला पुढे येत असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
पुणे शहरालगत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व मांजरी ही गावे आहेत. येथील दळणवळणाच्या सुविधांमुळे माणसाचा राहणीमान उंचावलेला आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या हौसेने कुत्रा व मांजर हे पाळीव प्राणी पाळतात. क्वचित हे पाळलेले प्राणी चावतात. मात्र, रस्त्यावरून भटकणारी कुत्री मोठ्या प्रमाणात नागरिकांचा चावा घेत आहेत.
लोणी काळभोर येथील आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर घ्यावी लागणारी लस उपलब्ध आहे. ही लस सर्व नागरिकांना मोफत देऊन योग्य उपचार केला जातो. कोणताही प्राणी होऊन मानवावर हल्ला करत नाही. मात्र, आपण त्याला भीती अथवा दगड मारला तरच तो बचावासाठी प्रतिहल्ला करतो. त्यामुळे नागरिकांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला करू नये, असे आवाहन डॉ. डी. जे. जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. दिवसा आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा हल्ला होत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पुण्यात जानेवारी ते ऑगस्ट 2023 पर्यंत 14,072 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे. या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरील उपाय
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, काही सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून नियमित भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम आयोजित केला जातो. पण त्याचबरोबर पाळीव श्वानदेखील या नसबंदी कार्यक्रमाखाली आणले पाहिजेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल. त्याचबरोबर संबंधित क्षेत्राची स्वच्छता त्या ठिकाणच्या कचराकुंड्या, हॉटेल वेस्ट, चिकन-मटन दुकानासमोरील टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावली, तर भटक्या कुत्र्यांना खायला मिळणार नाही. परिणामी, त्यांच्या संख्येत नियंत्रण ठेवणे सहज शक्य होईल.
पाळीव प्राण्यांच्या नसबंदीबाबत मार्ग काढणे शक्य
साधारणपणे एका श्वानांच्या नसबंदीसाठी रुपये 6000 ते 9000 पर्यंत खर्च येतो. जो काही श्वानप्रेमी मंडळींना परवडत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी संबंधितांनी मार्ग काढणे आवश्यक आहे. मोठ्या शहरातील खासगी पाळीव प्राण्यांचे दवाखाने, शासकीय पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये यांच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांच्या नसबंदीबाबत मार्ग काढणे शक्य आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घेतल्यास शक्य होईल.
– आकाश कुलकर्णी, लोणी काळभोर, ता. हवेली.