पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत, ता.शिरुर येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (एमईपीएल) कंपनीमधून निमगाव भोगी व परिसरात सोडण्यात येणारे दूषित पाणी तातडीने पूर्णपणे बंद करावे. अन्यथा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निमगाव भोगी ग्रामस्थांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समोर दिला आहे. कंपनीच्या प्रदूषित पाण्यासंदर्भात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी कंपनी बाहेर सोडण्यात येत असून, हे सांडपाणी निमगाव येथील तळ्यात आणि आसपासच्या विहिरीत जाते. या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारिंच्या अनुषंगाने खासदार डॉ.कोल्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पाहणी दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी खासदार डॉ. कोल्हेसमोरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील इशारा दिला.
यावेळी माजी आमदार अॅड अशोक पवार, चंद्रशेखर पाचुंदकर, संभाजी भुजबळ, निमगावच्या सरपंच ज्योती सांबारे, उपसरपंच विकास रासकर, माजी सरपंच अंकुश इचके, सचिन सांबारे, उत्तम व्यवहारे, लक्ष्मण सांबारे, धर्मराज रासकर, रविंद्र पावशे, दिपक राऊत, अविनाश सांबारे, विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी के.एम.गवळी आदिसह जिल्हा कृषि अधीक्षक संजय काचोळे, उपविभागीय कृषि अधिकारी सतिश शिरसाठ, तालुका कृषि अधिकारी सुवर्णा आदक, एमडीसीच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, उपअभियंता मिलिंद कासार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी.एम. कुकडे, निवासी नायब तहसीलदार विनय कोलवलकर, गटविकास अधिकारी महेश डोके, कृषि विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ डॉ.योगेश जाधव आदि अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र एन्व्हायरो कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे निमगाव भोगी, अण्णापूर, कारेगाव, फलकेमळा आणि सरदवाडी या गावातील पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे जलस्रोत प्रदूषित झाले असून, यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडून देखील याबाबत अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याचा सवाल खासदार डॉ.कोल्हे यांनी यावेळी उपस्थित एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांना केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसारच आपण याठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून, यावेळी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने एमईपीएल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. तसेच, या सांडपाण्यावर बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल आठवडाभरात सादर करावा.
हा अहवाल ज्येष्ठ नेते पवार यांना देण्यात येऊन, या प्रश्नासंदर्भात पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, परंतू पवार हे स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
नारायणगाव, ता.जुन्नर येथील कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून परिसरातील मृदेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार करावा. रांजणगाव औद्योगिक वसाहतीने वरील सर्व अहवालांचा अभ्यास करून एमईपीएल कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे नापीक झालेल्या जमिनींना नुकसान भरपाई देणे, शिरूर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे मृत झालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करणे आदि मागण्या यावेळी खासदार कोल्हे यांनी यावेळी केल्या.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी एमआयडीसीकडून कंपनीचे दूषित पाणी एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तातडीने पूर्णपणे बंद करावे, तसेच कंपनीला देण्यात आलेले 53 एकर शेती क्षेत्र वगळण्यात यावे, या मागण्या करत एमआयडीसी व प्रदूषण महामंडळाचे अधिकारी यांना फैलावर घेतले.
दूषित पाण्यामुळे नापिक झालेल्या शेतजमिनी व पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात कृषि विभागाशी सविस्तर चर्चा करणार असून, या कंपनीला कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसीकडून वाढीव शेती क्षेत्र देऊ देणार नसल्याचे खासदार कोल्हे यांनी यावेळी सांगितले.