पिंपरी : पिंपरी येथील चिखली परिसरातील साने चौकातील दुकानात जाऊन धमकी देत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. धंदा करायचा असल्यास दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असं म्हणून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखलीतील साने चौकात २३ मार्च रोजी ही घटना घडली आहे.
या प्रकरणी शुभम धनंजय नाकील (२६, रा. निगडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बापू कांबळे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांचे साने चौकात भागीदारीमध्ये मोबाइल दुकान आहे. दुकानात शनिवारी कामगार काम करत होते. त्यावेळी संशयित बापू कांबळे दुकानात आला. मी मर्डर करून जेलमधून बाहेर आलो आहे. धंदा करायचा असेल, तर मला महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असं आरोपी बापू कांबळे दुकानातील कामगाराला म्हणाला.
त्यावेळी त्याने दुकानावर दगडफेक केली. यावेळी फिर्यादी शुभम तेथे आले असता, त्या आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.