लोणी काळभोर, (पुणे) : जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी दरम्यान चोरीला गेलेले दागिने जिल्हा ग्रामीण पोलिसांनी तपास करून फिर्यादींना परत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीचे वेळी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी च्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये विशेषतः महिलांचे दागिने चोरी गेले होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनाप्रकारात स्वतः लक्ष देवून गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलिसांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळांना भेटी देवून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, सीसीटीव्ही तपासणे, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सर्वोतोपरी प्रयत्न करून गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेत आला. मुद्देमालातील सोन्याचे दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त दागिने हे महिलांचे असल्याने संवेदनशील होवून महिलांचे दागिने लवकरात लवकर त्यांना सुपूर्त करणे कामी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतले.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे नोव्हेंबर २०२३ चे गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गुन्हयात न्यायालयाकडून आदेश प्राप्त असलेल्या पाच गुन्हयांमधील चोरी गेलेले सोन्याचे दागिने, फिर्यादी व पिडीत महिलांना अंकित गोयल यांचे हस्ते सन्मानाने सुपूर्त करणेत आले.
सोन्याचे दागिन्यांबाबत महिलांचे भावनिक नाते असते, महिलांना त्यांचे आईवडीलांनी, पतीने तसेच नातेवाईकांकडून दागिने देण्यात आलेले असतात, त्यामुळे दागिन्यांबाबत महिला अतिशय संवेदनशील असतात, या कार्यक्रमाद्वारे पुणे ग्रामीण पोलीसांचे वतीने त्यांचे भावनांचा आदर, सन्मान करण्याचा प्रयत्न करणेत आला असल्याचे गोयल म्हणाले.
दरम्यान, सोन्याचे दागिने परत मिळाल्याने फिर्यादी व पिडीत महिलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला व त्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांचे आभार व्यक्त केले असून सदर कार्यक्रमास पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.