पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची मोबाइलवर चोरुन छायाचित्रे काढल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अजित अरुण शिंगोटे (वय-३१, रा. ओैंदुबर सहवास सोसायटी, शनिवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनिवार पेठेतील एका सोसायटीमध्ये तरुणी आणि तिच्या मैत्रिणींनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे. शिंगोटे या परिसरातील एका इमारतीत राहायला आहे. तिथे तक्रारदार तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंगोटे खिडकीत थांबून तरुणी आणि मैत्रिणींकडे पाहत होता.
तसेच खिडकीत थांबून तो मोबाइलवर चित्रीकरण करत होता. ही बाब तरुणी आणि तिच्या मैत्रिणीस समजली. त्यांनी तात्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर करत आहेत.
दरम्यान, पुण्यासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना, तसेच मोबाइलवर तरुणींची छायाचित्रे, चित्रीकरण करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नकळत मोबाइलवर चित्रीकरण करून चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.