पिंपरी : घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकरित्या गॅस काढून, कोणत्याही सुरक्षिततेशिवाय रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरून, त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. १५) विठ्ठलनगर येथील बिरादार यांच्या दुकानात रात्री सव्वा नऊच्या सुमारास केली.
याबाबत पोलीस शिपाई विजय हरीदास जानराव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेसाब मस्तानसाब मजकुरी (वय-२०, रा. पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठलनगर येथील बिरादार यांच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.
संबंधित तरुण कोणत्याही परवानगीशिवाय व कोणत्याही सुरक्षिततेशिवाय भरलेल्या सिलेंडरमधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. या वेळी जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीररित्या हे कृत्य करत असताना आढळून आला. त्याच्याकडून २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.