लोणी काळभोर : फर्निचरचे दुकान फोडून १ लाख रुपयांची रक्कम चोरी करून पळून चाललेल्या आरोपीचा एका अज्ञात वाहनाला धडकून अपघात झाला. अपघातानंतर त्याला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे रुग्ण असलेला हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एखाद्या बॉलीवूडपटाला शोभेल असे कथानक वास्तवात घडल्याची प्रचिती या प्रकारामुळे आली. शाहरुख अहमद सय्यद (वय ३१, रा. लोहगाव, मुळ रा. सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी शाहरुख हा लोहगाव परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनमध्ये काम करीत होता. आरोपीने काम करीत असलेल्या फर्निचरचे दुकान सोमवारी (ता. २९) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हातोडीच्या साह्याने फोडले. दुकानातील गल्ला फोडून त्यातून सुमारे १ लाख रुपये रोख रक्कम चोरून तो पळून जात होता.
दरम्यान, आरोपी शाहरुख सय्यद हा पळून तीन चाकी टेम्पोमधून (अपे प्यागो) सोलापूरच्या दिशेने चालला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना, आरोपीने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात थांबलेल्या एका अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात सोमवारी (ता. २९) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर वाटसरूंनी १०८ क्रमांकावर फोन करून या अपघाताची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. या घटनेची माहिती मिळताच, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
या वेळी तीनचाकी टेम्पोचालक शाहरुख सय्यद हा जखमी झाला होता. रुग्णवाहिका चालकाने तातडीने रुग्णाला रुग्णवाहिकेतून त्वरीत दवाखान्यात आणले. त्यानंतर शाहरुख याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले.
दरम्यान, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. डी. जे. जाधव यांना त्याच्याजवळ मोठी रक्कम आढळून आली. डॉक्टरांनी पैशांबाबत विचारणा केली असता, त्याला उत्तर देता आले नाही. त्यानंतर डॉ. डी. जे. जाधव यांनी या घटनेची माहिती तातडीने लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल बालाजी बांगर, घनशाम आडके, सागर कदम व राजेश दराडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस रुग्णाची माहिती घेत असताना, विमाननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे यांचा रुग्णाच्या फोनवर फोन आला. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस व विमाननगर पोलिसांची चर्चा झाली. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. विमाननगर पोलीस दवाखान्यात दाखल होईपर्यंत लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर करडी नजर ठेवली होती.
विमाननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे व त्यांचे सहकारी आरोग्य केंद्रात आले. पोलिसांनी पंचांसमक्ष चोरीतील रक्कम फर्निचरच्या मूळ मालकाला परत केली आहे. फर्निचर मालकाने डॉक्टर व पोलिसांचे आभार मानले. चंदननगर पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस डायरीमध्ये नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले. या वेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार केतन धेंडे आदी उपस्थित होते.
समयसूचकतेमुळे डॉ. डी. जे. जाधव यांचे सर्वत्र कौतुक
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांच्या समयसूचकतेमुळे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडला आहे. त्यामुळे डॉ. जाधव यांचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
रुग्णाकडील रक्कम पाहून संशय बळावला…
रुग्णावर उपचार करीत असताना, त्याच्याजवळ असलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, त्याला उत्तर देता आले नाही. त्यामुळे हा नक्कीच गुन्ह्याचा प्रकार असल्याची शक्यता वाटली. त्यामुळे याची माहिती ताबडतोब लोणी काळभोर पोलिसांना दिली. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व रुग्ण लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
– डॉ. डी. जे. जाधव, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र