पुणे : बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय पुण्यात होणार आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बालस्नेही न्यायालय उभारण्यात येणार आहे. या न्यायालयाच्या इमारतीचे काम दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
दरम्यान, ‘पोक्सो’ हा कायदा पीडित बालकांची काळजी घेतो. या प्रकरणांमध्ये पीडित बालकांनी खूप काही भोगलेलं असते. त्यांना सुरक्षितपणे सहायक व्यक्तीच्या उपस्थितीत जवाब आणि साक्ष नोंदविण्यासाठी विशेष साक्षीदार कक्ष असणार आहे. पीडित बालक आणि आरोपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे देखीलासणार आहे.
ही इमारत १८ महिन्यांत बांधून पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी जलद गतीने होऊन पीडित बालकांना न्याय मिळणार आहे. दरम्यान, नियोजित इमारतीचे भूमिपूजन न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घृणास्पद आहेत. खटल्यांमध्ये पीडित बालकांचा जवाच आणि साक्षीपुरावे तातडीने नोंदविले गेले पाहिजेत. पीडित बालक पुन्हा अत्यचाराला बळी पडणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी केली आहे.
अशी असेल इमारत
- चार मजली इमारतीत सहा न्यायालये
- लहान मुलांसाठी ‘प्ले एरिया’
- फौजदारी प्रक्रिया संहिता १६४ प्रमाणे जबाब घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष
- समुपदेशनासाठी स्वतंत्र खोल्या
- तक्रारदार, साक्षीदार, पीडितांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार
- कॅन्टीन, विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहे आदी सुविधा