- बापू मुळीक
सासवड : विशालगड (जि. कोल्हापूर) येथील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवभक्तांना आवाहन केले. त्यानुसार (दि. 14 जुलै) रोजी शिवभक्त व इतर हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते यांनी विशालगडाकडे मोर्चा वळविला. परंतु यातील काही संघटनाचे कार्यकर्ते विशालगडावर न जाता पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिमवाडीत पोहचले व त्यांनी तेथील मुस्लिम समाजाची जवळपास 42 घरे उद्धवस्त केली, त्यामध्ये शासकीय आकडेवारीनुसार 28 दुचाकी, 20 चारचाकी गाड्या जाळल्या. यामध्ये एकूण दोन कोट 83 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे.
याबाबत रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकध्यक्ष पंकज धिवार यांच्या नेतृत्वाखाली सासवड येथील नगरपरिषदेसमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी आलेल्या जोरदार पावसामुळे सदरची निषेध सभा रद्द करून पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात व प्रसार माध्यमाशी बोलताना पंकज धिवार असे म्हणाले की, विशालगडावरील अतिक्रमण काढणे हे योग्यच आहे. परंतु पायथ्याशी असलेले गजापूर गाव हे गडापासून चार किलोमीटर अंतरावर असताना देखील व अतिक्रमित नसताना सुद्धा फक्त मुस्लिम समाजाचे लोक आहेत म्हणून घरे जाळणे व गाड्यांची नासधूस करणे योग्य नाही याचा आम्ही निषेध करतो. यातील मुख्य आरोपी खासदार संभाजीराजे भोसले व त्यांचे इतर साथीदार यांना त्वरित अटक करावी. या घटनेतील पीडितांना प्रति व्यक्ती दहा लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी. ज्या मस्जिदीचे नुकसान केले आहे ती पूर्ववत उभारून द्यावी. नुकसान झालेल्या घरांची पुर्नबांधणी करून द्यावी.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, प्रामुख्याने बाळासाहेब धिवार, विशाल धेंडे, अंबर शिंदे, विकास देशमुख, प्रतिक धिवार, युवराज धिवार, मयूर बेंगळे, अतुल गायकवाड, प्रदीप फुलवरे, प्रस्मित धिवार, आदित्य धिवार, प्रतिक धिवार, ऋतिक धिवार, विजय मंडल, राज कांबळे, माऊली कांबळे, रोहन धिवार, परवीनताई पानसरे, जुबेर पानसरे, रवी वाघमारे असे उपस्थित होते.