–विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : महायुतीचे सरकार महाराष्ट्रासाठी धोकादायक असून या सरकारने शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हिताचे काम करीत नाहीत. सध्या सुरु असलेली प्रचंड महागाई, बेकारी, 5 ते 28 टक्के जी.एस. टी.लावायचे जनतेसाठी धोकादायक चुकीचे काम महायुतीचे सरकारने राज्यात केले आहे. लोकांना विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पैशाचे आमिष दाखविण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. लोकसभेच्या आधी तुमचं कोण लाडकं नव्हतं मग आता विधानसभा तोंडावर आल्यावरच बरे तुमच्या सर्व लाडक्या बहिणी कधी झाल्या ? याचे उत्तर या महायुतीच्या सरकारने द्यायला हवे आहे. इकडे या युतीच्या सरकार कालावधीत भ्रष्टाचाराची महाराष्ट्रात बजबज झाली असून महाराष्ट्रात तिजोरी लुटण्याचे काम हे सरकार करतयं.
महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीपासून महायुतीची साथ सोडली असून यापुढे राज्यातील जनता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना, काँग्रेसच्या बरोबर असून हे सर्व मिळून उद्याच्या निवडणुका नक्कीच प्रभावी करून येत्या विधानसभेत महाविकास आघाडी 170 ते 175 जागा निवडून येऊन महाविकास आघाडी जनतेच्या साथीने सत्तेत येणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी रयतेचे राज्य महाराष्ट्रात आणणार असल्याचे प्रतिपादन केले.
हवेली तालुक्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आष्टापुर फाटा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, तुमच्या शिरूर लोकसभा मतदार संघाचा खासदार व शिरूर, हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बरोबर असून यापुढे येत्या विधानसभा निवडणुकीत एवढ्या वेळी आमदार अशोक पवारांना साथ द्या ते यापुढे मंत्री मंडळात जातील. यामुळे अधिक विकासाचा फायदा शिरूर-हवेलीच्या जनतेला होणार असून मतदार संघात लाल दिवा येऊन तुमच्या मतदार संघाला मोठी विकासाची गती अशोक पवारांच्या माध्यमातून होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
हवेली तालुक्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आष्टापुर फाटा येथील शिवशंकर मंगल कार्यालयात कार्यक्रम पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, महिला हवेली तालुकाध्यक्ष सुरेखा भोरडे, महिला शिरूर तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे यांची भाषणे पार पडली. तर प्रास्ताविक हवेली तालुकाध्यक्ष संदिप गोते व आभार युवकचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी व्यक्त केले.
यंदा शिरूर-हवेलीत लाल दिवा येणार – खासदार अमोल कोल्हे
राज्यातील 20 कारखान्यांना युतीच्या सरकारने कर्ज मंजूर केले. मात्र जाणून बुजून घोडगंगा कारखान्याला कर्ज मंजूर केले नसून आमदार अशोक पवारांना अडचणीत आणण्याचे काम या युतीच्या सरकारने केले आहे. श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी या युतीच्या सरकारच्या माध्यमातून विकास आराखाड्याचे कामाचे भूमिपूजन होऊन कित्येक महिने लोटले अजून काम सुरु झाले नाही. यावेळी जनता जनार्दन आमदार अशोक पवारांना भक्कम साथ देत असल्याने यंदा शिरूर-हवेलीत आमदार अशोक पवार यांच्या मंत्रिपदाच्या स्वरूपात लाल दिवा येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.