राजेंद्रकुमार शेळके
पुणे : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (IAPT) महाराष्ट्र रिजनल कौन्सिल या संस्थेद्वारे, पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषय शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन १३ व १४ जानेवारी २०२४ रोजी भरविण्यात येत आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम, अध्यापन व अध्ययन पद्धती, आव्हाने, संधी व भवितव्य यावर विस्तृत चर्चा करण्याचे नियोजन आहे. याशिवाय भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. शैक्षणिकदृष्ट्या याचा लाभ सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांतील भौतिकशास्त्र विषय शिक्षक व विद्यार्थी वर्गाला होणार आहे.
याबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी सांगितले की, या अधिवेशनाच्या उद्घाटनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समारोपप्रसंगी होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय अधिवेशनाचे संयोजक प्रा. भरत कानगुडे माहिती देताना म्हणाले की, या दोन दिवसांमध्ये पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, इंदूरच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या डॉ. कल्पना मस्की, विल्सन महाविद्यालय मुंबईचे प्रा. महेश शेट्टी व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची ‘नवीन शैक्षणिक धोरण व भौतिकशास्त्राचे अध्ययन’ या विषयाशी संबंधित माहितीपूर्ण व्याख्याने होणार आहेत. डॉ. घाली महाविद्यालय, गडहिंग्लज येथील डॉ. शिवानंद मस्ती हे भौतिकशास्त्र विषयातील अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणार आहेत. तसेच सायंकाळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर येथील डॉ. नितीन शिंदे ‘आकाशदर्शन’ हा कार्यक्रम घेणार आहेत.
या निमित्ताने भौतिकशास्त्र विषय शिक्षकांना आपले शोधनिबंध वाचन करण्याची संधी निर्माण झाली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक भौतिकशास्त्राचे शिक्षक, संशोधक आणि व्यावसायिक एकत्र येणे अपेक्षित आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात व्याख्याने, पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि पोस्टर प्रेझेंटेशन असतील, ज्याद्वारे भौतिकशास्त्र शिक्षणातील नवीनतम ट्रेंड, तंत्रे आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या अधिवेशनास इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या देशव्यापी संस्थेच्या सचिव डॉ. रेखा घोरपडे, स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ शेवाळे, सचिव डॉ. लता जाधव व या संस्थेच्या विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण राज्यस्तरीय अधिवेशनाची जबाबदारी पुणे विभागीय कौन्सिलने घेतली आहे.