-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बँड स्पर्धा बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे (दि. 1 ऑक्टोबर 2024) रोजी उत्साहात संपन्न झाली.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिषदेचे उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपविभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहसंचालक रमाकांत काठमोरे यावेळी म्हणाले की, शालेय जीवनामध्ये उत्तम नागरिक घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आवश्यक आहे. बँड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सांघिक भावना, राष्ट्रप्रेम आदी भावना वाढीस लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा केल्यास मिळणारे यश शाश्वत असते.
उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे म्हणाल्या की, राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वीच यश संपादन केले आहे. हे कौतुकास्पद आहे. बँड स्पर्धेमधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. स्पर्धेमध्ये यश किंवा अपयश हे महत्त्वाचे नसून स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्वतः आनंद घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असते.
राज्यस्तरीय स्पर्धेचे नियम व अटी स्पष्ट करून उपसंचालक डॉ. सावरकर यांनी सांगितले की, राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांना मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील विभागांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्तरावर महाराष्ट्रातील संघानी यश मिळविल्यास राष्ट्रीय स्तरावर विजेते संघांचे सादरीकरण होईल. त्यांनी विजेत्या संघांना राष्ट्रीय स्तरावर राज्याचा नावलौकिक उंचावण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरावरील या बँड स्पर्धेमध्ये पाईप बँड व ब्रास बँड या प्रकारामध्ये मुलांच्या गटातून सहा संघानी व मुलींच्या गटातून सहा संघांनी सादरीकरण केले. राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये 350 विदयार्थी व 24 शिक्षक सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक बाळासाहेब गायकवाड व पद्मजा लांमरुड यांनी केले. उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रास्ताविक केले. अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे यांनी आभार मानले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार व सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या नेतृत्वात उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे, पद्मजा लांमरुड बाळासाहेब गायकवाड, रूपाली खेडेकर, मंजु मते, दत्तात्रय कसबे,संतोष साळवी यांच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला.राज्यस्तरीय बँड स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
-1. ब्रास बँड…
मुले (प्रथम ) – संजीवनी सैनिकी विद्यालय, कोपरगाव.
मुली ( प्रथम ) – सेंट एलॉयसिस कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, भुसावळ.
2. पाईप बँड…
मुले (प्रथम ) – राजाराम बापू पाटील सैनिकी विद्यालय, इस्लामपूर.
मुली ( प्रथम ) – भोसला सैनिकी विद्यालय, नाशिक