पुणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाच्या वतीने मंगळवारी डेक्कन परिसरातील नदीपात्रात संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत नदीपात्रात उभारण्यात आलेले हॅण्डलूमचे स्टॉल पाडण्यात आले, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे.
इतर अतिक्रमणावर कारवाई करण्यात येऊन ते पाडण्यात आले. मुठा नदीच्या पात्रात अनेक दिवसांपासून अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. नदीची पूररेषा या अतिक्रमणामुळे धोक्यात आल्याची बाब पुढे आली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंधारण विभाग आणि पुणे महानगरपालिकेत समन्वय होत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्याचा फायदा हा अतिक्रमण करणाऱ्यांना होत असे. पुण्यातील स्वयंसेवी संघटना आणि सामजिक संघटनांकडून याबाबत कायमच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहे. नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत हरित लवादाकडेही अनेक खटले प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या तीन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.