लोणी काळभोर : थेऊर व परिसरातील अवैध ताडी अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (ता.8) छापा टाकला आहे. या छाप्यात 40 लीटर ताडीसह मुद्देमाल जप्त केला. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक संजय कोल्हे यांनी दिली.
बसवराज नरसय्या भंडारी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थेऊर (ता. हवेली) व परिसरात अवैध ताडीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तेथे आरोपी बसवराज भंडारी हा ताडी विकताना आढळून आला.
आरोपीकडून 40 लीटर ताडीसह विक्री साहित्य असा सुमारे साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक संजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जवान प्रिया चंदनशिवे, जवान प्रमोद पालवे व दत्तात्रय आबनावे यांच्या पथकाने केली आहे.