राहुलकुमार अवचट
दौंड : खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान प्रस्तावित असलेल्या २७ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाला सुमारे २१९०.४७ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असून ३ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. दौंड, हवेली, इंदापूर व बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याचा २७ किलोमीटर भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे शहराची सर्वांगिण बाजूने होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदुषण, जलनाश यामुळे कालव्याची होत असलेली हानी व त्यामुळे कालव्याच्या वहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नविन मुठा उजवा कालव्याच्या १ ते ३४ मधील लांबीसाठी २७ किलोमीटर खडकवासला ते फुरसुंगी पर्यंत बोगदा करावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती.
तसेच विधानसभा सभागृहात देखील वेळोवेळी प्रश्न, लक्षवेधी चर्चा, अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. याबाबत शासनस्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच १९ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, आमदार कुल यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.
या पर्यायी खडकवासला – फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे सुमारे ३ टि.एम.सी. पाणी बचत होऊन दौंड, हवेली, इंदापूर व बारामती तालुक्यातील सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सिंचनापासून वंचित राहणारे ३४७१ हे. इतके क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला प्रकल्पाअंतर्गतच्या नविन मुठा उजवा कालव्याचा कि. मी. १ ते ३४ ऐवजी खडकवासला- फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन २०२२ – २३ च्या दरसूचीवर आधारित रू. २१९०.४७ कोटी इतक्या किंमतीच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
जुना मुठा उजवा कालवा अस्तरीकरण, मजबुतीकरणास मंजुरी
तसेच जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १८८.७५ कोटी रुपयांच्या निधीस देखील उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
दौंड तालुक्यातील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया करावी आशा सूचना देखील जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याला देखील लवकरच मान्यता मिळेल असे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले.