पुणे : पुण्यातील भाईंनी पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. यानंतर आता याच भाईंना खाकीची धडकी भरली आहे. दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे पुण्यातील भाईंचे रिल्स सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. मात्र पोलिसांच्या खाकीचा धसका घेत इंस्टाग्रामवरील रिल्स डिलीट करायला सुरुवात केली आहे. या रिल्समुळे सध्या पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. अल्पवयीन मुलं देखील असे रिल्स अपलोड करुन दहशत निर्माण करत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची सोशल मीडियावर गुन्हेगारीचे रिल्स टाकणाऱ्या टोळ्यांवर करडी नजर असणार आहे.
गुन्हेगारांना पोलिसांनी तंबी
पुण्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलीच तंबी दिली आहे. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. असं सांगूनही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरुन आता पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हे रिल्स पाहून पोलिसांनी गजा मारणे पासून ते निलेश घायवळपर्यंत सगळ्यांनाच दम दिला आहे. असे रिल्स पोस्ट करु नका सांगूनही हे रिल्स का पोस्ट केले जात आहेत? असा जाब पुणे पोलिसांनी विचारला असता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रिल्सशी आमचा काही संबंध नाही, शहरातील अट्टल गुन्हेगारांनी पोलिसांना जबाब दिला आहे. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंट वर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले होते. हे व्हिडीओ शोधून डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.
पोलीसी खाक्या दाखवायला लागेल : अजित पवार
पुणे शहारत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांची काढलेली परेड चांगलीच चर्चेत आली आहे. सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती उतरत नसेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे.