पुणे : ससून रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील असणाऱ्या ससून शासकीय रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल आणि गैरसोय होत आहे. बंद असणारी एमआरआय मशीन तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हा महासचिव कृष्णा साठे, अनुज रंगारी, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, रुग्णांना खाजगी रुग्णालयात अथवा लॅबमध्ये जाऊन एमआरआय स्कॅन करण्याचा ‘खर्चिक सल्ला’ रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आमच्याकडे जर पैसे असते तर आम्ही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलो असतो का? तसेच वीस दिवसांपासून मशीन आहे ती दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल रुग्णांनी उपस्थित केला आहे.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव हे अनेक दिवसांपासून सुट्टीवर असल्याने रुग्णांवरील उपचार व त्यांची व्यवस्था रामभरोसे आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास व इतर प्रशासकीय समस्या उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे एमआरआय मशीन त्वरित सुरु झाले नाही, तर आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रोहन सुरवसे-पाटील यांनी दिला आहे.