पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुकानासमोर गप्पा मारत उभे राहू नको, असे सांगून देखील न ऐकल्यामुळे दुकानदाराने तरुणाच्या पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील दिनशी अपार्टमेंट येथे घडली आहे.
या प्रकरणी अंकुश राम मगर (वय-३८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी फरहाज अक्रम कुरेशी (वय-२८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी अंकुश व त्यांचा मित्र अनिल हे दोघे दिनशी अपार्टमेंट समोर गप्पा मारत उभे होते. तेथेच फरहाज कुरेशी याचे लब्बाईक चिकनचे दुकान आहे. हे दोघे दुकानासमोर उभे असताना कुरेशी याने सांगितले कि, इथे माझ्या दुकानाशेजारी थांबून बडबड करु नका, दुसरीकडे जावा, असे सांगूनसुद्धा तेथेच दुकानासमोर बोलत उभे राहिले. फिर्यादी यांनी तुझ्या दुकानाच्या समोर उभा नाही राहिलो, असे बोलले. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत इथे कशाला येऊन बसतो, असे म्हणून त्याने चिकनच्या दुकानातून चाकू घेऊन बाहेर आला.
दरम्यान, फरहाजने रागाच्या भरात फिर्यादी यांच्या पोटात चाकूने वार केला. चाकू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे, फिर्यादी जोरजोरात आरडाओरडा करु लागले. त्यांचा आरडाओरड ऐकून त्यांच्या आईने आणि तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फिर्यादी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करीत आहेत.