पुणे : पुणे-नगर महामार्गावर एस टी बसने पदचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली आहे. या बसच्या धडकेत पदचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर एस बी आय बँकेसमोर घडली. राजगुरुनगर ते पैठण ही बस होती. दरम्यान अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं वय ४१ असून त्याची अजून ओळख पटलेली नाहीये.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पादचारी हा पुणे-नगर महामार्ग ओलडत होता. राजगुरुनगर ते पैठण ही बस नगरच्या दिशेने जात होती. पदचारी अचानक बससमोर आल्याने चालकाला बस नियंत्रणात आणता आली नसल्याने बसची पदचाऱ्याला जोरदार धडक बसली.
या धडकेत पदचारी खाली पडला आणि बसच्या मागील चाकाखाली आला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस आणि लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर बस चालक तेथून पळून जात त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. मृत व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर हे ही अपघात स्थळी दाखल झाले.तसेच वाहतूक कर्मचारी जितेंद्र पवार, स्वप्नील गालफाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.