टाकवे बुद्रुक : तळेगाव दाभाडे एसटी डेपोमधून आंदर मावळमध्ये सुटणाऱ्या एसटी बस या अनेक वर्षापासूनच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या असल्याचे चित्र दिसून येत असून या एसटी बस नेहमीच रस्त्यामध्ये बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मागील पाच दिवसांपूर्वी सकाळच्या वेळेत तळेगाव दाभाडे ते आंदर मावळमधील सावळा या ठिकाणी जाणारी एसटी बस टाकवे बु. येथे बस स्टॉपला बंद पडली. तर शुक्रवारी (दि.४) सकाळी फळणे फाटा येथे तळेगाव ते खांडी निळशी जाणारी एसटी बस बंद पडली. तळेगाव अगारातून आंदर मावळसाठी जाणाऱ्या एसटी बस व आंदर मावळमधून शहरामध्ये जात असणाऱ्या एसटी बस आठवड्यातून अनेक वेळा बंद पडणे ही आंदर मावळमधील प्रवाशांसाठी नित्याची समस्या झाली आहे.
परिणामी विद्यार्थी, कामगार, दूग्ध व्यवसाय, शेतकरी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला – पुरुष कामगार, उपचार घेण्यासाठी विविध हॉस्पिटलला जाणारे रुग्ण वृद्ध यामुळे त्रस्त झाले आहेत. जुन्या असणाऱ्या एसटी बस मोडकळीस आलेल्या आहेत. व्यवस्थित नसणाऱ्या एसटी बस बंद करून नवीन एसटी बस आम्हाला कधी उपलब्ध होणार आहे की नाही? असा प्रश्न आंदर मावळ मधील ५० ते ६० गावच्या प्रवासी नागरिकांनी केला आहे.