पुणे : स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मनाची जिद्द व प्रबळ इच्छाशक्ती हवी. म्हणजे कोणतेही संकट आले तरी आपण त्याला सहज मागे टाकू शकतो. पुणे जिल्ह्यातील शेतकरी रोहिदास नवघणे यांनी या वाक्यांना प्रत्यक्ष रूप दिले आहे. परिस्थितीला सामोरे न जाता यश मिळवणारच हे ध्येय उराशी बाळगणाऱ्या नवघरे यांनी मोठी स्वप्ने पाहिली. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपल्या स्वप्नातली विंटेज कार प्रत्यक्षात उतरवली. भारतीय बनावटीची ही विंटेज कार ई व्हेईकल आहे. एकदा चार्ज केली की तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सामान्य शेतकरी असलेल्या रोहिदास नवघणे यांच्या यशाची ही कहाणी आहे. केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या नवघणे यांनी एखाद्या इंजिनिअरलाही लाजवेल अशी कमाल करून विंटेज कार घडवली आहे. कार बनविण्याची प्रेरणा त्यांना दिल्लीला फिरायला गेल्यावर मिळाली. दिल्ली दौऱ्यात त्यांनी विविध प्रकारच्या कार दिसल्या. त्याचवेळी अशी कार आपण तयार करायची, असा निश्चय त्यांनी केला.
दरम्यान, मावळमध्ये परतल्यानंतरही त्यांची इच्छाशक्ती कमी झाली नाही. कार साकारायचीच, हा निश्चय कायम होता. त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या एकेक गोष्टी जमवायला सुरवात केली. भंगारातील साहित्याचा देखील त्यामध्ये समावेश होता. तर काही साहित्य रोहिदास यांना विकत घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेतून ही कार साकारण्यात आली आहे.
विंटेज कारचे वैशिष्ट्य काय?
- विंटेज कार हे ई-व्हेईकल असून, भारतीय बनावटीची आहे.
- ही कार एकदा चार्ज केली की तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते.
- टाकाऊपासून टीकाऊ अशी ही मजबूत कार आहे.
- विंटेज कारची किंमत सामान्यांना परवडणारी आहे.
रोहिदास यांनी ही कार अडीच लाखांत तयार केली आहे. मात्र, पुढे ही कार बाजारात आणायची असेल तर त्यासाठी पेटंटची गरज आहे. स्वप्ने पाहिली तर सत्यात उतरवणे शक्य होतात, हे या शेतकऱ्याने कृतीतून दाखवून दिले आहे.