-राहुलकुमार अवचट
यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प गणेश महाराज जाधव (जालना) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. जाधव महाराज आईवडिलांची सेवा हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन, अवतार कार्य, सप्ताहातील काल्याचे महत्त्व यांसह अनेक विषयांवर प्रबोधनपर कीर्तन केले. यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने जाधव महाराज यांचा सत्कार करण्यात आला. दहीहंडी फोडत काल्याने व महाप्रसादाने जन्मोत्सव सप्ताहाची सांगता करण्यात आली.
दहीहंडी फोडत भाविकांना काल्याच्या महाप्रसादाचे वाटप
श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव शनिवारी (दि.23) रात्री बारा वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फुलांनी सजविलेला गाभारा व मंदिर परिसरात लावलेल्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर पारंपारिक गोंधळी यांच्या वतीने नाथांचा गोंधळ संपन्न झाला. आज सकाळी हभप गणेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसाद देवून श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली.
सप्ताह सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सप्ताह काळात सेवा करणाऱ्या अनेक वारकरी मंडळींचा सन्मान करण्यात आला. यवत हे गाव बाजारी गाव म्हणून ओळखले जात असले तरी कलावंताची कदर करणारे गाव म्हणून यवत चे नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात आहे, असे ह.भ.प. नाना महाराज दोरगे यांनी सांगितले. यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने मानधन, तर कापड दुकानदार संतोष दोरगे यांच्यावतीने कीर्तनात सेवा देणाऱ्या वारकऱ्यांना पोशाखाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यवत व यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.