युनूस तांबोळी
शिरूर : मार्च महिन्यात वसंतऋतूची चाहूल लागते. चैतन्याची सळसळ जाणवते. दऱ्या-कपारीच्या ठायी, वृक्ष-लतांवर सळसळणारी नवी पालवी उगवते. निष्पर्ण झालेल्या पळसाच्या जर्द केशरी फुलांचा मेळा मनातल्या भाव भावनांचा गुंता अधिकच वाढवतो. सृष्टीतील ऋतुगंध बहरला की मनातला ऋतू नकळत आनंदाने बहरतो. ऐन उन्हाळ्यात सृष्टीतील चैतन्य बहरतं तर दुसरीकडे वार्धक्यात कोमजलेले चेहरे सृष्टीतील गारवा शोधत समाधान मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. हा विरोधाभास ग्रामीण भागात अगदी जवळून पहावयास मिळतो.
ग्रामीण भागात निसर्गाच्या या बदलाप्रमाणे जुने-जाणते, वयस्कर व्यक्ती देखील या काळात झाडाच्या गर्द सावलीत अथवा चावडीवर दिसू लागतात. शेताच्या काटेरी वाटेवर उन्हाचा चटका वाढून गवताची पाती करपू लागतात. त्यातून पाण्याची समस्या देखील जाणवते. त्यावेळी उजाड रानाकडे फिरकण्यापेक्षा गार सावलीच्या शोधात ही वयस्कर मंडळी असतात. आपुलकीच्या गप्पा देखील रंगात येतात. खरं तर आयुष्यातील वार्धक्याचा हा काळ आनंदात घालवायचे आणि फुलाप्रमाणे कोमजून जायचे असते. या काळात बालपण व तरूणाई ज्यांच्या सानिध्यात हसतखेळत दिवस घालवले, त्यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध हसत-खेळत दृढ करावेत, असे प्रत्येकालाच वाटते. शहरात असा सहवास दुर्मिळच असतो. पण गावाकडे या महिन्यात अशी वयस्कर मंडळी एकत्र आली की टाळ्यांवर टाळ्या व हास्याचा फवारा उडतो. या वयातही मिशांवर हात फीरवत, गेलेल्या वयावर आलेल्या अनुभवाचे शिंतोडे टाकत जगण्याचा आनंद घेतात.
वसंताच्या वाटेवर गुलमोहर बहरतो. काटेसावर फुलांनी सावरते. आंब्याचा मोहर दरवळत राहतो. कठीण खडकावर पळस केसरी फुलांनी न्हाऊन निघतो. निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. सुखःदुख आयुष्यात ऋतूप्रमाणे येतजात राहतात. ऋतूचक्र न बोलता मनातले भाव सहजपणे प्रकट करत राहतात. आयुष्य हे खडकाप्रमाणे कडक असते. मात्र, खडक फोडूनही पळस असा काही फुलतो, की सारा आसंमत जणू अग्नीज्वालांनी लपेटून जातो. पळसाचे हे फुलणे म्हणजे कठीण परिस्थितीतील जीवन गाणे होय.
थंडीतला काटा सरला की निसर्गातील रंगांची उधळण करत होळी येते. वेगवेगळी फुले आपल्या ऋतूप्रमाणे बहरली जातात. केशरगंध चाखण्यासाठी रंगीबेरंगी पक्षी फुलांवर ताव मारतात. निसर्गातील हा वसंतोत्सव डोळ्यांत साठवताना मनाचा कोपरा गहिरा होत जातो.
वयाचे देखील असेच असते. वंसताऋतूप्रमाणे आयुष्याला बहर येतो. नंतर जसजसे वार्धक्य जवळ येईल, तसतसा वैशाखाचा वणवा जवळ आल्यासारखा वाटतो. मरण अटळ असले तरी नेहमी वंसतासारखे पल्लवीत व्हावे, प्रफुल्लीत राहून जीवनाचा आनंद घ्यावा, मनसोक्त जगावे. सध्या शेतीतील कामे कमी झाल्याने तसेच लग्नसराईचा हंगाम, यात्रा, जत्रा, उत्सव, उरूस सुरू असल्याने जुन्या जाणकार व्यक्ती भेटून खुशालीच्या गप्पा मारतात. आपुलकीच्या या दिलखुलास गप्पा रंगात येऊन आयुष्य घालविण्याचा प्रयत्न ही वयोवृद्ध मंडळी करताना दिसत आहेत.