गोरख जाधव
डोर्लेवाडी, ता. 01 : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. गायत्री लॉन्स, डोर्लेवाडी येथे आयोजित या शानदार सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र कबड्डी संघाचे कोच दादा आव्हाड, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सुप्रिया नाळे, झारगडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अजित बोरकर तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या अश्विनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य व गणेश वंदनेने केली. नर्सरीच्या चिमुकल्यांनी ‘जिंगल बेल’ या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केले. शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित नाटकाने उपस्थितांना विचार करायला लावले. यासोबतच ‘गोरा कुंभार’, ‘महाकाल’ आणि ‘सेवगर्ल’ या विविध सादरीकरणांनी उपस्थितांचे मन जिंकले.
संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूलने 2024-25 या शैक्षणिक वर्षात 14 राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच, ‘लीड चॅम्पियनशिप’मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थापक अभिजित निंबाळकर, अध्यक्षा सुमित्रा निंबाळकर, मुख्याध्यापक पृथ्वीराज नवले, तसेच जयश्री थोरात, सोनाली सूर्यवंशी व सर्व शिक्षकवृंदांचे ग्रामस्थ आणि पालकांनी कौतुक केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील शाळेने सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जाचे आयोजन सादर केल्याबद्दल उपस्थितांनी विद्यालयाचे विशेष कौतुक केले.