भोर / जीवन सोनवणे : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. 4) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. या संपात भोरमधील सर्व डाकसेवक सहभागी झाले होते. त्यामुळे टपाल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सचिव एकनाथ मंडलिक यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील डाकसेवकांना किमान आठ तासांचे काम देऊन खात्यात समाविष्ट करणे, पाच लाख ग्रॅज्युएटी करणे, १८० दिवसांची रजा वाढ, अद्यावत वैद्यकीय सुविधा, पद्दोन्नती मिळणेबाबत अशा या व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारला. हा संप करून सुद्धा सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ५ डिसेंबरपासून देशातील सर्व डाकसेवक, कर्मचारी बेमुदत संपावर हे जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण डाकसेवा संघाचे अध्यक्ष वसंत चरेकर यांनी सांगितले.
या एकदिवसीय लाक्षणिक संपात भोर तालुक्यातील तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोळे, सुभाष साळेकर, दत्तात्रय वरे, अशोक कंक, संतोष बुदगुडे, यशवंत पवार, अश्विनी शिंदे, संतोष सणस, सुनील साळुंखे, सोमनाथ माळी, कृष्णा बिलवरे, चंद्रकांत डाळ, रामचंद्र दावे, तुषार धुमाळ नवनाथ राठोड, सविता भागवत ,वैशाली जेधे, सुजाता कोंढाळकर, सोहेल मनेर सहभागी झाले होते.